Wednesday, December 29, 2010

संकल्प २०११

फिलिंग नाईस !!! व्हॉट ए स्टार्ट टू दि डे!
दिवस उगवला तसा नेहेमीसारखाच ! डोक्यात खेळणाऱ्या विचारांनी आणि श्वासा च्या त्रासाने झोपेचा खेळखंडोबा झालेला, अंथरुणातून उठायला झालेल्या १५ मिनिटांच्या उशिरामुळे आता सबंध दिवसाचे वेळापत्रक कोसळते की काय या चिंतेने जीवाच्या आकांताने उरकलेली आन्हिके, उभ्याने केलेला ब्रेकफास्ट आणि धावत पकडलेली बस...
स्टेशन वर पोचलो, आणि धापा टाकत पूल चढलो. नशिबाने ट्रेन अजून फलाटावरच होती. ट्रेन मध्ये चढताच, ट्रेन सुटली. मग मनी जरा शांतता आली. वाटले, की कमीतकमी ऑफिस ला पोहोचायला तरी उशीर होणार नाही आज. सहप्रवाशांनी हनुमान चालीसा चा जप सुरु केला. आणि तो पुढचे स्टेशन येईपर्यंत संपला. म्हटले, आता यांच्या नेहमीच्या चर्चा सुरु होणार, कोल  इंडिया चा IPO , मल्लिका शेरावत ने अडीच कोटी रुपये १५ मिनिट नाचायला  मागीतलेत, इत्यादी, इत्यादी..
 
आणि सुखद अपेक्षाभंग!
अचानक मला बीस साल बाद मधले "ये नयन डरे डरे" ऐकू आले. मनात आले, की ३१ डिसेंबर जवळ येतोय. कोणी बेवडा सकाळी सकाळीच दारू ची स्वप्ने पाहू लागलेला  दिसतोय. गाणे मलाही आवडत होते, (आणि दारू सुद्धा! खोटे कशाला बोला!) म्हणून मी पण त्या सुरात माझा सूर मिळवला. मला गाणारा दिसत नव्हता, आणि त्याला मी. गाणे संपले, आणि एकदम मला एकानी सांगितले, भाई अंदर आवो ना. मी खुश. एका पायावर, आणि sack सांभाळत उभे राहण्या पेक्षा,  जरा comfortably उभे राहायला मिळेल, म्हणून. मला आमंत्रण देणारा कंपू फारच विविधरंगी होता. वय सगळ्यांचे ५०-५५ च्या आसपास, कोणी शेयर बाजारवाला , कोणी बँकर, कोणी कंपनी ने दिलेल्या पासामुळे फर्स्ट  क्लास मध्ये यायला  मिळालेला, आणि कोण कोण. अचानक माझी sack एका सदगृहस्थाने हातात घेतली. म्हणाला, आराम से खडे हो जावो. मी सुखावालोच. मग म्हणाला, तुमको हेमंत कुमार का आवाज अच्छा निकलने को आता है, अब गाना गावो. च्याआयला आली आफत! एक तर घशाचे धुराडे झालेले, आदल्या रात्रीचा श्वासाचा त्रास, सगळेच मला 'थोबाड उघडून विचका करून घेऊ नकोस" असे सुचवत होते. ही अस्वस्थता बहुतेक बसायला जागा देणाऱ्या uncle ने जाणली. म्हणाले, गावो दीक्रा, इधर कोई टिकेट निकालके तुम्हारा गाना नाही सुननेवाला है. मग अस्मादिक पण घसा खरवडू लागले. अर्ध्या तासाच्या लोकल प्रवासात मग, हेमंत कुमार, मन्ना डे, तलत मेहमूद, मुकेश, किशोर, रफी, सगळ्यांची हजेरी लागली. सुरात गाण्याची अट नव्हती, त्यामुळे बरे होते. शब्दांची याददाश्त पक्की असल्याच्या  भांडवलावर, दादर येई पर्यंत गात राहिलो, मजा येत राहिली.
दादरला उतरल्यावर, एकदम डोक्यात आले, की किती दिवस झाले, आपण गाणी म्हणणे, ऐकणे सोडाच, पण आठवण्यात तरी वेळ काढला आहे? आणि मग वाटले, की २०-२५ मिनिटात जर ७-८ गाणी तुम्हाला इतका आनंद देऊन जाऊ शकतात, तर आपण थोडा वेळ नियमितपणे या गाण्यात घालवू शकत नाही?
शिवाय एक गाणे आठवले, की त्या गाण्याबरोबर निगडीत आठवणी, त्या गाण्यातले शब्द, वैगैरे मनात रुंजी घालू लागतात. आणि मग मज्जा येते.
म्हणून मग ठरवले, की कवायतीचे स्वरूप का येईना, पण
रोज एक गाणे तरी डोक्यात घोळवत ठेवायचे !!!

3 comments:

  1. Kharach khup chan......hope aamhala next year changal vachaila milel....

    ReplyDelete
  2. kiti lihun zalay sir?? upload kara ki... waachayla aatur aahe me..

    ReplyDelete